ठाणे (प्रतिनिधी ) : राज्याला ठाण्यातून मुख्यमंत्री मिळाले असल्यामुळे ठाणे शहराला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसात पालिका निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे चित्र असल्यामुळे मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. नेहमी मुंबईत साजरा होणारा मनसेचा वर्धापन दिन सोहळा यंदा ठाण्यात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वातावरण निर्मिति करण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात येत आहे.
ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणी साहेब या नावाचे फलक लावण्यात आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अलीकडेच हल्ला झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज मनसैनिकांना कोणता आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र असलेल्या ठाणे शहरात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यामध्ये विविध कारणांमुळे धुसफुस सुरू आहे. या दोन्ही गटांसह भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.