मुंबई (प्रतिनिधी): राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्ये पहिल्या दोन आठवड्यामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाकडून जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या तुलनेत तिसऱ्या आठवड्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली असून, रुग्ण वाढीच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. १६ ते २५ मार्चदरम्यान राज्यामध्ये तब्बल २६४८ करोना रुग्ण सापडले आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये ३५५ करोनाचे रुग्ण सापडले तर दुसऱ्या आठवड्यामध्ये यामध्ये दुपटीने वाढ होऊन १५ मार्चपर्यंत राज्यात ७५४ रुग्ण सापडले होते. यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्याला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १६ ते २५ मार्चदरम्यान राज्यामध्ये तब्बल २६४८ करोना रुग्ण सापडले आहेत. ही वाढ मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातील करोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत तिपटीने अधिक आहे. या कालावधीत प्रत्येक दिवशीची रुग्ण संख्या ही २०० पेक्षा अधिक आहे. २२ व २४ मार्च रोजी करोना संख्येने ३०० चा टप्पा ओलांडला आहे. तर २५ मार्चला ४०० टप्पा ओलांडला आहे. यामुळे राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती १९५६ इतकी झाली आहे.
मार्चमध्ये १३जणांचा मृत्यू
मार्चच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये करोनाने चार जणांचा मृत्यू झाला होता. मात्रा त्यानंतर १६ ते २५ मार्च या १० दिवसांच्या कालावधीत मार्चमध्ये नऊ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. १७ मार्च, १८ मार्च, २१ मार्च आणि २२ मार्चला अनुक्रमे एका रुग्णाचा, २४ मार्चला तीन तर २५ मार्चला २ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला.
करोनाचा नवा उपप्रकार आला असल्यास त्याचा परिणाम करोना रुग्णसंख्येत वाढ होण्यावर होऊ शकतो. नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, को मोर्बिडीटी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
– डॉ. भरत जगियासी, सचिव, इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई