म्हस्केच्या विरोधात घोषणा दिल्याने केले होते गुन्हे दाखल
ठाणे (प्रतिनिधी ) : नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या ठाण्यातील शिवसैनिकांवर ठाणे नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील शिवसैनिकांवर पोलिसांची दडपशाही सुरू असल्याचे टीका प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी केली.
दादर येथील शिवाजी पार्कवर (दि. ०५ ऑक्टोबर ) रोजी शिवतीर्थावर झालेल्या ५६ व्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ठाण्यातील अबाल, वृद्ध, तरुण शिवसैनिक महिला मोठ्या संख्येने मासुंदा तलाव येथील रंगो बापुजी गुप्ते चौक, जांभळी नाका, ठाणे येथे जमा होऊन मिरवणुकीने वाजत गाजत कायदा सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन ठाणे रेल्वे स्थानक येथे गेले होते. या मिरवणुकीची पूर्व कल्पना संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. दरम्यान सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात आले होते.
दरम्यान पोलिसांनी वयोवृद्ध शिवसैनिकांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये महारष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) १३५ अन्वये गुन्हे दाखल करून २० शिवसैनिकांना नोटीसा दिलेल्या आहेत. त्यातील शंकर गणपत शिंदे हे ७७ वर्षाचे आणि प्रदीप मनोहर शिंदे हे ६२ वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत. पोलिसांच्या व महाराष्ट्र शासनाच्या या दडपशाहीचा ठाण्यात सर्व थरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या दडपशाहीच्या विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने जन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना खासदार राजन विचारे व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख यांनी दिला आहे.