ठाणे (प्रतिनिधी ) : ठाण्यातील काही भागात पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे महानगरपालिका आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीवर पिसे येथील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी बसविण्यात आलेले न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरूस्तीचे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. हे काम १० ऑक्टोबर २०२२ ते २० ऑक्टोबर २०२२ या कालावधीत होत आहे. या कामामुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.
न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नदीच्या पाण्याची पातळी कमी केली जाईल. त्यामुळे या कालावधीत पिसे येथील उदंचन केंद्रात पाण्याची पातळी खालावली जाईल. या दुरूस्ती कालावधीत ठाणे महानगरपालिकेस होणारा पाणीपुरवठा १० टक्के कमी होणार होईल. परिणामी ठाणे शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील गावदेवी, कोपरी, टेकडी बंगला, किसननगर, हाजुरी आणि इंदिरानगर इत्यादी परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येणार आहे. हा पाणी पुरवठा पुर्वपदावर येईपर्यत पुढील १० ते १२ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.