या चालू महिन्यात 21 महिला बेपत्ता ; रॅकेट असल्याची भीती
ठाणे (प्रतिनिधी ) : राज्यात मुले पळविणारी टोळी आली असल्याचे व्हिडीओ रोज आपण सोशल मीडियावर पाहतो मात्र राज्यात घडत असलेल्या या गंभीर घटनांकडे अफवा असल्याचे सांगत दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला मोठ्याप्रमाणात बेपत्ता होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आहे आहे, अनेक कुटुंब त्यांच्या घरातील महिला हरविल्याचे गुन्हा नोंदवत आहे मात्र त्यांच्या कुटुंबातील महिला परत आल्या नसल्याच्या उदाहरणे समोर येत असल्याचे मनसेकडून दावा करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रातून महिला गायब होण्याचे प्रमाण वाढतच आहे पण कोणालाही त्याचे काही पडलेले नाही. महिला गायब होण्यामागे कोणते रॅकेट तर नाही ना? याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. गायब झालेल्या महिलांना त्यांच्या घरी पुन्हा सुखरूप पोहचवणे ही सरकारची, पोलिसांची जबाबदारी आहे, हे विसरून चालणार नाही’, असे ट्विट करत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी महिला गायब होण्याच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मागील ३९ दिवसांत तब्बल ५८ महिला-तरूणी घराबाहेर गेल्यानंतर त्या परतलेल्याच नाही. ही एक गंभीर बाब आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. महिला व तरूणींना पळविणारे रॅकेट तर नाही ना, अशी शंका यामुळे उपस्थित होत आहे.
औरंगाबाद शहरातून गेल्या सप्टेंबर महिन्यात एकूण १३४ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरीत आहे. यात ६२ महिला व तरुणींचा समावेश आहे. १८ ते २९ वयोगटातील तब्बल ४३ तरुणी घरातून बाहेर गेल्या व त्या परत आलेल्याच नाहीत, तर २९ तरुण घरातून निघून गेले आहेत. शहराच्या विविध पोलीस ठाण्यांतून प्राप्त आकडेवारीनुसार, चालू महिन्यात १ ते ८ ऑक्टोबरपर्यंत २१ जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यात १५ महिला-तरुणींचा समावेश आहे. १८ ते २९ वयोगटातील तब्बल ११ तरुणी घराबाहेर गेल्यानंतर परत आलेल्याच नाही. त्या नेमक्या गेल्या तरी कुठे? याचा शोधही अद्याप पोलिसांना लागलेला नाही.