ठाणे (प्रतिनिधी ) : राज्यात गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना पक्षातील दोन गटात संघर्ष सुरु असून आता तो संघर्ष नव्या रुपात आला आहे. शिंदे आणि ठाकरे गट शक्ति प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक संधीचा संपूर्ण फायदा घेत असल्याचे गेल्या काही दिवसात दिसले आहे. या दोघांच्या संघर्षामुळे तिसऱ्याला लाभ म्हणजेच अनेक गरीब कुटुंबाला रोजगार मिळाला आहे. ते कसे असा सवाल यावेळी उपस्थित होतो.
राज्यात दिवाळी सण साजरा करण्यात येत असून प्रत्येकवेळी नाका किंवा शहरातील प्रमुख भागात शिवसेना पक्षाचा आकाश कंदील लागत असे मात्र आता शिवसेना दोन गटात विभागली गेली असल्यामुळे कंदील बनविनाऱ्यांना दुप्पट काम मिळाले. आता शिंदे गटाचा वेगळा कंदील तर ठाकरे गटाचा वेगळा कंदील अशी दोन कंदील बनविण्याची कामे स्थानिक कामगारांना मिळाला आहे.
भाजपाने अंधेरी पोटनिवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेतल्याने उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झाला असला, तरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रणनीती आखली आहे.
त्यासाठी दिवाळी सणाचा पुरेपूर वापर करून घेतला जाणार असून, उटण्याची पाकिटे, पणत्या आणि घरोघरी वाटल्या जाणाऱ्या अन्य भेटवस्तूंवर मशाल हे चिन्ह छापण्याची सूचना करण्यात आली आहे. विशेषतः आकाशकंदीलांवर धगधगती मशाल ठळकपणे दर्शवून, नवे निवडणूक चिन्ह तळागाळात पोहोचवण्याची योजना आहे.