मुंबई : राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नोव्हेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल(टीईटी)जाहीर झाला आहे. यात धक्कादायक म्हणजे मुंबई विभागातून परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी केवळ 1 टक्का उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. तर राज्याचा निकालही कमालीचा घटला असून केवळ 3.69 उमेदवार पात्र ठरले आहेत.
मागील वर्षी टीईटी परीक्षेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेकडून नोव्हेंबर २०२१ मध्ये या परीक्षेचे आयोजन केले होते, त्यानंतर या परीक्षेचा निकाल कमालीचा घटला आहे. परिषदेने परीक्षा प्रक्रियेत प्रचंड मोठ्या प्रमाणात काळजी घेतली होती, तसेच निकाल जाहीर करताना खूप मोठ्या प्रमाणावर पारदर्शकताही ठेवली होती.त्यामुळे २०१९ मधील परीक्षेच्या निकालापेक्षा अर्ध्याहून अधिक निकालाची टक्केवारी घटली असल्याने अनेक उमेदवारांना या निकालाची धडकी भरली आहे.
नोव्हेंबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या टीईटीची परीक्षा ही राज्यभरातील 4 लाख 2 हजार 18 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यांपैकी केवळ 17 हजार 287 उमेदवार टीईटीत पात्र ठरले आहेत. तर 2 हजार 433 उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या परीक्षेत राज्यातील केवळ 3 ट्रान्सजेंडर उमेदवारच पात्र ठरले आहेत. पेपर 1 मध्ये केवळ तर पेपर 2 (एसएस) मध्ये 2 ट्रान्सजेंडर उमेदवार टीईटी पात्र आहेत. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
दरम्यान, मुंबई विभागातील 1 हजार 521 उमेदवार टीईटी परीक्षेत पात्र ठरले आहेत. यातील सर्वाधिक उमेदवार ठाणे जिल्ह्यातील आहेत. ठाण्यातील 640 उमेदवार आहेत. त्याखालोखाल मुंबई 373, रायगड 304 आणि पालघरमधील 204 उमेदवार टीईटी पात्र ठरले असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.