उल्हासनगर (वार्ताहर) : आमदार नितेश राणे आपल्या दबंग वक्तव्यासाठी प्रसिद्ध असून मंगळवारी पुन्हा असा एक आक्रमक इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. धर्मांतराला विरोध करणाऱ्या हिंदू कार्यकर्त्यांना माराल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना दिला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांन पोलिसांनी मारहाण केली असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यामुळे मंगळवारी राणे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. .
८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर शहरातून २६ वर्षीय तरुण आणि चोवीस वर्षीय तरुणी घरातून पळून गेले होते, या दोघांचा शोध घेतला असता, दोघेही पश्चिम बंगालमधील एका गावात आढळून आले, त्यानंतर पोलिसांनी त्या मुलीचे तिच्या घरच्यांशी संभाषण करून दिले होते, मात्र या मुलीने घरातून दागिने चोरुन नेल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली होती. ही तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीच्या नातेवाईकांना आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन याबाबत पोलिसांनी मारहाण का केली याचा जाब विचारला, राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून पोलीस जर हिंदू विरोधी वागत असतील तर याबाबत आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करू असेही नितेश राणे यांनी बजावले. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची बदली करा अन्यथा तीव्र पडसाद उमटतील असा इशारा राणे यांनी दिला.