नवी दिल्ली – दिवाळीत पूजन करतांना माझ्या मनात विचार आला, जो मी १३० कोटी देशवासियांच्या वतीने सरकारसमोर मांडत आहे. आपण सर्वांनी दिवाळीत प्रार्थना केली. प्रत्येकाने श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांची पूजा केली असेलच. व्यापारी श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती त्यांच्या कार्यालयात, तसेच त्यांच्या खोल्यांमध्ये ठेवतात. त्यामुळे केंद्र सरकारने भारतीय चलनावर श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे चित्र छापावे, असे आवाहन देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केले. यावरून भाजपने केजरीवाल यांच्यावर ‘हिंदुत्वाला विरोध करणारे केजरीवाल मतांसाठी अशी मागणी करत आहेत’, अशी टीका केली आहे.देवतांच्या आशीर्वादाने अर्थव्यवस्था सुधारेल !
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पुढे म्हटले की, चलनावर गांधी यांचे छायाचित्र आहे तसेच ठेवावे; मात्र दुसऱ्या बाजूला श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांचे चित्र असावे. जेणेकरून अर्थव्यवस्थेला त्यांचा आशीर्वाद मिळेल. श्री गणेशजींना विघ्नांचा नाश करणारे मानले जाते. त्यांच्या आशीर्वादाने अर्थव्यवस्था सुधारेल. ‘सर्व भारतियांनी श्रीमंत बनले पाहिजे’, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. आपण प्रयत्न करतो; पण परिणाम दिसत नाहीत. देवतांचा आशीर्वाद असेल, तर फळ मिळते.