Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

पालकांनो सावधान ठाण्यात गोवर पाय पसरतोय

Thane : शिळ आणि कौसा या भागात गोवर या आजाराचे बाधित सापडले असून या दोन्ही आरोग्य केंद्रांच्या हद्दीत २४ तास आणि सातही दिवस घरोघरी जाऊन व्यापक सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कौसा येथे ५, शीळ येथे ४, मुंब्रा २, एन एम गल्लीत २ गोवर बाधित सापडले आहेत. गोवरची लक्षणे दिसू लागल्यापासून तो बरा होईपर्यंत दहा दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे शिळ आणि कौसा आरोग्य केंद्रात पाच दिवसात सर्वेक्षण पूर्ण करून दुसरी फेरी लगेच पुढील पाच दिवसात पूर्ण करावी. जेणेकरून सर्व संशयित बालके शोधून उपचार करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल असे आयुक्तांनी सांगितलं.

ज्या बालकांनी लस घेतली नसेल त्यांच्या पालकांनी त्यांना लसीकरण करून घ्यावे. लस घेतलेल्या बालकांना गोवर होत नाही. अपवादाने झालाच तर कोणत्याही धोक्याशिवाय बालक बरे होते. म्हणून लसीकरण आवश्यक असल्याचा पुनरुच्चार आयुक्त बांगर यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला असून आवश्यकता भासल्यास पार्किंग प्लाझा येथेही विलगीकरण कक्ष तयार आहे. तसेच, तेथे बालकांसाठी अती दक्षता कक्ष ही उपलब्ध आहे. लसीकरण वाढवणे, फिरते लसीकरण पथक तैनात करणे, ठाणे महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्या, बालवाड्या येथील मुलांचे गोवर आणि रुबेला लसीकरण गतिमान करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

सर्वेक्षणाचे काम २४ तास आणि सातही दिवस सुरू राहील. नागरिकांनी लसीकरणाला विरोध करणे घातक आहे. काही नागरिक जर बालकांनी लस घेण्यास विरोध करत असतील तर ते प्राणघातक ठरू शकते. याची जाणीव करून देण्यासाठी दररोज शीळ आणि कौसा या दोन आरोग्य केंद्रांच्या हद्दीत चौक सभा घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. लसीकरणाची व्यवस्था सर्व नागरी आरोग्य केंद्रे, छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे सुरू आहे. तसेच गोवरची लक्षणे आढळली तर ताबडतोब आरोग्य केंद्रात या. उपचारांनी गोवर बरा होतो. मात्र त्यात विलंब झाला तर धोक्याचे ठरू शकते.

ताप, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे, घशात दुखणे, अशक्तपणा, अंग दुखणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे दिसणे अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. नागरिकांना गोवरसदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी घरगुती उपाय करण्यात वेळ न घालविता तात्काळ ठाणे महापालिकेच्या नजीकच्या आरोग्यकेंद्राशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

Related posts

आनंदाचा शिधा वाटप किटमधून रवा,चणाडाळ गायब

dhakkadayak

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला वर्षाला केवळ ५०० रुपये

dhakkadayak

ठाण्यात शिवसैनिकांवर पोलिसांची दडपशाही ?

dhakkadayak

Leave a Comment