मुंबई ( प्रतिनिधी) : मुंबईत समुद्रात बुडून मृत्यू होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वरळी कोळीवाडा येथील समुद्रात ५ मुले बुडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी येण्यापूर्वी स्थानिकांनी तात्काळ समुद्रात धाव घेऊन या ५ जणांना समुद्रातून बाहेर काढून नजीकच्या केईएम व हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्याने सदर ५ मुलांपैकी कार्तिक चौधरी (८) व सविता पाल (१२ मुलगी) या दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. तर कार्तिकी गौतम पाटील (१३ / महिला), आर्यन चौधरी (१०) व ओम चंद्रजित पाल (१४) हे तिघे बचावले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु कार्तिकी व आर्यन या मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
समुद्रातील ओहोटीमुळे घात झाला
वरळी, कोळीवाडा येथील वाल्मिकी चौक भागात शेजारी शेजारी राहणारी दोन मुली व तीन मुले अशी पाच मुले शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हनुमान मंदिर, विकास गल्ली येथून समुद्रात ओहोटी असताना खेळायला गेली. मात्र खेळताना त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही सर्व मुले समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन बुडू लागली. त्यावेळी त्यांनी आरडाओरड केली. सुदैवाने कोळीवाड्यातील जवळजवळ ७० – ८० स्थानिक नागरिक या बुडणाऱ्या मुलांच्या मदतीला धावले. त्यामुळे अगोदर कार्तिकी, आर्यन व ओम या तिघांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र कार्तिक चौधरी व सविता पाल हे दोघेजण थोडं दूर अंतरापर्यन्त म्हणजे नरिमन भाट या ठिकाणी वाहून गेले. त्याठिकाणी शोध घेतल्यावर ते दोघे सापडले. कार्तिकी पाटील हिला केईएम रुग्णालयात तर उर्वरित चौघांना नजीकच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र हिंदुजामधील डॉक्टरांनी कार्तिक चौधरी व सविता पाल यांच्या शरीरात समुद्राचे पाणी जास्त प्रमाणात गेल्याने व त्यांचा श्वास कोंडल्याने ते मृत पावल्याचे जाहीर केले. मात्र कार्तिकी ही केईएम रुग्णालयात व आर्यन चौधरी हा हिंदुजा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. तर ओम पाल याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.