मुंबई (प्रतिनिधी ) : महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या गणित विषयाची पेपरफुटी प्रकाणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी ) स्थापना करण्यात आली आहे. पेपर फोडणाऱ्यांची मोठी टोळी असल्याचे संशय पोलिसांना आले असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून हे निर्णय घेण्यात आले आहे. या एसआयटी पथकात एक वरिष्ठ अधिकारी, दोन अधिकारी तर चार कर्मचारी आहेत.
राज्य बोर्डाकडून यंदा कॉपीमुक्त परीक्षा नावाने मोठा अभियान राबविण्यात आला होता मात्र पहिल्याच दिवशी या अभियानाची हवा निघाली त्यापुढे आणखी कहर म्हणजे गणित विषयाचा पेपर फुटला, एवढे सगळे सुरु असतांना बोर्डाने कोणत्याही प्रकारची पेपरफुटी झाली नसल्याचे जाहीर केले मात्र एका दिवसानंतर पोलिसांनीच पेपरफुटी झाल्याचे सांगत गुन्हा दाखल केला.
लोणार येथील एका खासगी शाळेवरील शिक्षक शे. अकील शे. मुनाफ यांनी 3 मार्च रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा मोबाईलवर फोटो काढून तो किनगावजट्टू येथील गजानन शेषराव आडे यांच्यासह अनेकांना पाठविला. त्यांनतर गजानन आडे यांनी शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक तथा शिक्षक गोपाल दामोदर शिंगणे यांना पाठविला. गोपाल शिंगणे याने खुपीया या गृपवर तो व्हायरल केला. तो बारावीची परीक्षा देत असलेला आदिनाथ काळूसे यांच्या मोबाईलवर आला.
आदिनाथ काळूसे याच्या मोबाईलवरुन कोणीतरी पवन नागरे यांना तो पेपर व्हायरल केला. पवन नागरे याने गणेश शिवानंद नागरे याला फॉरवर्ड केला आणि गणेश नागरज यांनी तो माध्यमांना पाठविला. अशी सर्व परिस्थिती असतांना या प्रकरणाचा दादर येथील शाळेचा संबध पुढे आला. त्यामुळे या सर्व प्रकरणात एक मोठी टोळी काम करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांनी ठरवले आहे. म्हणून या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. आता पुढे आणखी कोणते नाव समोर येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.