Dhakkadayak
ब्रेकिंग न्यूज
ठाणे

ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे अपघातात निधन; तिघे किरकोळ जखमी

ठाणे (प्रतिनिधी) : सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय सोहळ्यात खुमासदार सूत्रसंचलनाने उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठाण्यातील प्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचे आज महाड येथून ठाण्यात परतत असताना पनवेलच्या चिंचवणजवळ भीषण अपघातात दुर्देवी निधन झाले. ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आटोपून मोरे कार चालवत त्यांच्या टीमसोबत येत होते. यावेळी त्यांची कार रस्त्याच्या कडेला उभ्या शिवशाही बसवर मागून धडकली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोरे यांच्या तीन सहकारी महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दीपेश मोरे यांच्या आकस्मिक निधनाने ठाण्यातील सांस्कृतिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
        ठाण्याच्या देवदया नगर भागात राहणाऱ्या दीपेश मोरे (४६) यांनी ‘परिणिताज इव्हेंट’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून नेटके कार्यक्रमांचे नियोजन व खुमासदार सूत्रसंचालनाच्या माध्यमातून जनमानसात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. मंगळवारी महाड येथे फौजदार भावकी कावळे आयोजित शिमगोत्सवाच्या निमित्ताने ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ व ‘महाराष्ट्राची शान लावणी’ या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्याचे नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी दीपेश मोरे यांच्या ‘परिणिताज इव्हेंट’ या संस्थेकडे होती. हाच कार्यक्रम करून मोरे आणि त्यांचे सहकारी ठाण्याला परतत असताना आज सकाळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.
           चिंचवणजवळ अलिबाग – पनवेल शिवशाही बसचे टायर फुटल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या उभी होती. यावेळी गाडीला पाठीमागून मोरे यांच्या कारने धडक दिली. गंभीर जखमी मोरे यांना पळस्पे वाहतूक पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात त्यांच्या सहकारी श्रद्धा जाधव, रश्मी खावणेकर, कोमल माने किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सतत हसरा चेहरा व प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा एक धडपड्या कलाकार ठाणेकरांनी गमावल्याची भावना मोरे यांच्या निधनानंतर समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे.

Related posts

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळी आधी

dhakkadayak

मोबाईल वापरण्यास विरोध केल्यामुळे १२ वर्षाच्या मुलीची आत्महत्या

dhakkadayak

बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

dhakkadayak

Leave a Comment